बहुजन महापुरुषांना बदनाम ठरविणाऱ्यांच्या षडयंत्रावर लेखणीतून प्रहार करणारी पुस्तके बाजारात येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी आज येथे केले.

पुणे -पिंपरी

            पुरोगामी विचारधारेवर कार्य करत असलेल्या अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या ‘बहुजन उद्धारक आणि त्यांच्या विचारांचे मारेकरी’ आणि संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी लिहिलेल्या ‘गिरीश कुबेरला काळं का फासलं? या अंशुल प्रकाशनने प्रकाशित केलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे होते. वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष ॲड. सर्वजित बनसोडे, संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, समता सैनिक दलाचे संघटक मनोज गरबडे, महेश घाडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे, प्रदेश संघटक शोभा जगताप, प्रदीप पवार आदी यावेळी विचारमंचावर उपस्थित होते.

कोळसे पाटील पुढे म्हणाले, समाजामध्ये उद्रेक आणि विद्रोह पसरविण्याचे छुपे काम करण्यात हिंदुत्ववादी संघटना अग्रेसर असून बहुजन महापुरुषांना बदनाम करणे, त्यांची खिल्ली उडविणे याद्वारे समाजातील वातावरण गढूळ करून चुकीचा इतिहास नव्या पिढीवर बिंबविण्याचा छुपा अजेंडा घेऊन ते कार्यरत आहेत. त्यामुळे विरोधाच्या कृतीबरोबर साहित्याच्या माध्यमातून त्यांना उत्तर देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

तर आपल्या अध्यक्षीय भाषणात मानव कांबळे यांनी, बहुजनांचा विचार व कार्याला छोटे ठरविण्याबरोबरच आता गांधी हत्येनंतर संघावर घातलेली बंदी व गोध्रा हत्याकांड हे दोन मुद्दे केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणामधून जाणीवपूर्वक वगळले असून सोयीस्कर विचार पेरण्याचे त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे अशा पुस्तकांची गरज ही समाजमनाला आरसा दाखविणारी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सर्वजीत बनसोडे, अभिमन्यू पवार, मारुती भापकर, तसेच मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, ॲड. लक्ष्मण रानवडे, सुनिता शिंदे आदींची भाषणे झाली.

कार्यक्रमाची सुरूवात रत्नप्रभा सातपुते व इतर महिलांनी जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदनेने झाली. तर प्रस्ताविक लेखक अरविंद जगताप यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे तर आभार सतिश काळे यांनी मानले.

YOUR REACTION?

Facebook Conversations