तापमान ४२ अंश, असताना देखील पदाधिकारी व कार्यकर्ताच्या लोकांची १२ कि.मी.चा मोठा शक्ती प्रदर्शन, गर्दीचा उच्चांक,
मोदी व महायुती सरकारच्या कामाची पोचपावती द्या - एकनाथ शिंदे

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

चिंचवड, दि. १० मे - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शनिवारी) पिंपरी-चिंचवड शहरात झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'महा रोड शो'ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करत बारणे यांच्या प्रचाराची मोठ्या धुमधडाक्यात सांगताही झाली. 

मुख्यमंत्र्यांच्या 'महा रोड शो'मध्ये खासदार बारणे, आमदार अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे, महेंद्र थोरवे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, चंद्रकांता सोनकांबळे, मयूर कलाटे, सचिन चिखले, निलेश बारणे, महेश बारणे, सीमा सावळे, तुषार हिंगे, मोरेश्वर शेडगे, संदीप वाघेरे, सुनील पाथरमल, बाळासाहेब वाल्हेकर, प्रकाश मलशेट्टी, निलेश तरस, राजेंद्र तरस, कुणाल वाव्हळकर, आशा शेंडगे, डब्बू आसवानी, संतोष बारणे, माया बारणे आदी पदाधिकारी, माजी नगरसेवक व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

ढोल-ताशांचा दणदणाट आणि फटाक्यांचा कडकडाटात क्रेनच्या सहाय्याने फुलांचे भले मोठे हार घालत, फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत, भगव्या कागदांच्या तुकड्यांचा पाऊस पाडत चौका-चौकात मुख्यमंत्री शिंदे व खासदार बारणे यांचे जंगी स्वागत करण्यात येत होते. भगवे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे फेटे घातलेले तरुण दुचाकीस्वार तसेच शेकडो मोटारी सहभागी झाल्याने महा रोड शोचा संपूर्ण मार्ग 'भगवा' झाला होता. 

भगवे फेटे व भगव्या साड्या परिधान केलेल्या महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. कडाक्याचे ऊन असतानाही रस्त्याच्या दुतर्फा कार्यकर्ते व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री शिंदे व खासदार यांनी हात उंचावून अभिवादन केले की एकच जल्लोष होत होता. 

बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः उपस्थित राहिले होते. त्यावेळी मिरवणुकीत देखील ते सहभागी झाले होते. त्यानंतर ते प्रचाराच्या सांगतेसाठी पुन्हा आवर्जून मावळ मतदारसंघात आल्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत होते.

चिंचवड येथील चापेकर चौकातून दुपारी सव्वाबारा वाजता क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शिल्पसमूहास अभिवादन करून मुख्यमंत्र्यांच्या महा रोड शोचा प्रारंभ झाला. चिंचवड गावातील पॉवर हाऊस चौक, लिंक रोड, तानाजी गावडे चौक, भाटनगर, इंदिरा गांधी उड्डाणपूल, शगुन चौक, साई चौक, गुरुद्वारा, जयहिंद स्कूल चौक, काळेवाडी नदी पूल, काळेवाडी रोड, पंचनाथ चौक, एम एम स्कूल, बीआरटी रोड, तापकीर चौक, रहाटणी चौक, काळेवाडी फाटा, बेलठीकानगर १६ नंबर, संतोष मंगल कार्यालय, गुजर नगर, वाकड रोड चौक या मार्गे डांगे चौक, असा महा रोड शोचा मार्ग होता. डांगे चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ ठीक पावणेतीन वाजता या महा रोड शोची सांगता झाली.

मोदी व बारणे यांची हॅटट्रिक निश्चित - मुख्यमंत्री

नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची तर श्रीरंग बारणे यांची खासदारकीची हॅटट्रिक निश्चित आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'रोड शो'ची सांगता करताना व्यक्त केला. ४२ अंश तापमान असतानाही हजारो लोक हसतमुखाने रोड शोमध्ये सहभागी झाले होते. आमचे स्वागत करत होते. रस्त्याच्या दुतर्फा माणसांची गर्दी होती. इथले मतदार आनंदी व खूश दिसले. सर्वांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद मी पहिल्यांदाच पाहिला. गेली दहा वर्षे पंतप्रधान मोदी यांनी केलेले काम व गेल्या दोन वर्षातील महायुती सरकारचे काम याची पोचपावती १३ मेला मतदानातून द्यायची आहे आणि चार तारखेला विरोधकांचे बारा वाजवायचे आहेत, असे शिंदे म्हणाले. 

महायुती ४५ पार जागा जिंकणार - एकनाथ शिंदे

राज्यात मतदानाचे तीन टप्पे पार पडले आहेत आणि चौथ्या टप्प्याचे मतदान १३ तारखेला होत आहे. कोणी काहीही बोलू देत, पण राज्यात महायुती ४५ पार जागा जिंकणार, हे निश्चित आहे, असे भाकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. 

महिलांना लोकसभा व राज्यसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा क्रांतिकारक निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. त्यामुळे सकाळी महिलांनी आधी मतदान करावे व नंतर कुटुंबातील सगळ्यांचे मतदान करून घ्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले. तुमचे एक मत विकास करणार आहे, देश घडवणार आहे, बारणे यांना खासदार करणार आहे आणि मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

बारणेंना मंत्रिपद हवे, आधी ८०℅  मतदान करा!

मावळ मतदारसंघात गेल्यावर निवडणुकीत ६३ टक्के मतदान झाले होते. यावेळी ८०℅  मतदान करा आणि पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर एका महिला कार्यकर्ती म्हणाली, 'बक्षीस म्हणून आप्पांना मंत्रीपद द्या'. त्यावर हजरजबाबीपणे मुख्यमंत्री शिंदे उत्तरले, 'आधी ८०℅ टक्के मतदान तर करून दाखवा!'

रणरणत्या उन्हात महाशक्ती प्रदर्शन.

रणरणत्या उन्हात महाशक्ती प्रदर्शन.

बारणे यांना मोठा प्रतिसाद.

बारणे यांना मोठा प्रतिसाद.

YOUR REACTION?

Facebook Conversations