पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे, दि. १

                 पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिंहगड ई-बस सेवेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस संचलन मैदान येथे महाराष्ट्र दिन निमित्ताने आयोजित राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमानंतर हा शुभारंभ कार्यक्रम करण्यात आला. 


यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख, मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण आदी उपस्थित होते. 


उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड मनपा यांच्या आर्थिक मदतीमुळे पीएमपीएमएलचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. एसटी महामंडळाच्या संप काळात पीएमपीएमएलच्या माध्यमातून उत्तम सेवा देण्यात आली. पीएमपीएमएलच्या ई-बस सेवेमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून शहरातील नागरिकांना प्रदूषणविरहीत सेवा देण्याचा प्रयत्न आहे. 


उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याहस्ते वाघोली येथील चौथ्या ई-बस आगाराचे तसेच 'माझा सिंहगड माझा अभिमान' योजनेअंतर्गत ई-बस सेवेला हिरवा झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. तसेच ई-बसच्या प्रातिनिधिक स्वरूपात किल्ल्या प्रदान करण्यात आल्या  


पर्यावरण पूरक पिशव्या निर्मिती करण्यासाठी सदिच्छा महिला बचत गटाच्या मनीषा पायगुडे आणि सिद्धिविनायक महिला बचत गटाच्या अलका पडवळ यांना शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले. 


                          मार्गदर्शिकेचे प्रकाशन

श्री.पवार यांच्या हस्ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुणे शहर हे विद्येचे माहेर घर असून येथे बाहेरगावावरून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह व योजनांची माहिती होण्यासाठी मार्गदर्शिका उपयुक्त ठरेल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


राज्यात जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, आपल्या बोलण्यातून, कृतीतून इतरांच्या भावना दुखणार नाही, याची काळजी घ्यावी आणि पोलिसांना साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. 

YOUR REACTION?

Facebook Conversations