पिंपरी चिंचवड सह अनेक अधिकार्यांची बदली, मावळ मध्ये मात्र चर्चेला उधाण किशोर आवारे हत्याला काय दिशा मिळणार.

 

 पुणे दि. २३ :– सोमवारी रात्री उशिरा राज्य पोलीस दलातील तब्बल ११० पोलीस उप अधीक्षक सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जा च्या सर्व साधारण बदल्या करण्यात आल्या त्यामध्ये पुणे शहरातील ५ सहाय्यक पोलिस आयुक्तांचा देखील समावेश आहे. या बदली मध्ये मावळ चे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे याची ही बदली करण्यात आली त्यामुळे मावळ मध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची १२ मे रोजी गोळ्या झाडून कोयत्याने सपासप वार करून भर दिवसा हत्या करण्यात आली. या प्रकारचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी एसआयटी विशेष तपास पथकाची स्थापना केली. सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे या एसआयटीच्या प्रमुख होत्या. त्यांची आता चंद्रपूर येथे बदली झाली आहे. त्यामुळे किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जाणार, याची चर्चा सध्या मावळमध्ये रंगली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील तीन सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या झाल्या. यामध्ये गुन्हे शाखेचे प्रशांत श्रीराम अमृतकर यांची पोलीस उपअधीक्षक गडचिरोली येथे बदली झाली आहे. तर वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत औदुंबर डिसले यांची पोलीस उपअधीक्षक नंदुरबार येथे बदली करण्यात आली आहे. चाकण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे यांची पोलीस उपअधीक्षक चिमूर, जि. चंद्रपूर येथे बदली झाली आहे.

प्रेरणा कट्टे यांच्या ३२ महिन्यांचा कार्यकाळ

सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची सन २०२० मध्ये नागपूर शहर येथून बदली करण्यात आली. मात्र त्यांना बदलीचे ठिकाण देण्यात आले नव्हते. ९ ऑक्टोबर २०२० रोजी गृह विभागाने काढलेल्या बदल्यांच्या आदेशात प्रेरणा कट्टे यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली. त्यानंतर ३१ मार्च २०२१ रोजी चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राम जाधव हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी प्रेरणा कट्टे यांची वर्णी लागली. त्यांना पिंपरी-चिंचवड शहरात २ वर्ष ८ महिने एवढा कालावधी मिळाला. त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली झाली आहे.

वेषांतर करून पोलीस ठाण्यात केले स्टिंग ऑपरेशन

तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस ठाण्यात सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून कशा प्रकारची वागणूक मिळते, याचा आढावा घेण्याचे ठरवले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी वेषांतर करून पिंपरी, वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात भेटी दिल्या. त्या दरम्यान त्यांना पोलीस सर्वसामान्य नागरिकांना बरी वागणूक देत नसल्याचे निदर्शनास आले. या वेषांतराचा फायदा नागरिक केंद्रित पोलिसिंग करण्यासाठी झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

किशोर आवारे हत्या प्रकरण जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची १२ मे दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात तालुक्यातील मोठ्या राजकीय नेत्यांचेही नाव आल्याने प्रकरणाची व्याप्ती मोठी झाली होती. पोलिसांनी चार मारेकऱ्यांना अटक केली. मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचे समोर आल्याने सुपारी देणाऱ्या आणि मदत करणाऱ्या दोघांना देखील पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या वडिलांच्या परवानाधारक पिस्तुलातील काडतुसे आवारे यांच्या शरीरात आढळली. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली.

किशोर आवारे हत्या तपासाचे पुढे काय

किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एसआयटीची स्थापना केली. त्याचे प्रमुख म्हणून एसीपी प्रेरणा कट्टे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. तपासात काही धक्कादायक बाबी समोर येत असतानाच एसआयटी प्रमुखांची बदली झाली. त्यामुळे किशोर आवारे हत्या प्रकरणाच्या तपासाचे पुढे काय होणार, अशी चर्चा सध्या मावळमध्ये सुरु आहे.

देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट म्हणाले, “किशोर आवारे हत्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी प्रमुखांनी अद्याप बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी चार्ज सोडलेला नाही. त्यांनी चार्ज सोडल्यानंतर त्यांच्या जागी एसआयटी प्रमुख म्हणून वरिष्ठ पातळीवरून संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक होईल.” व ते कोण असणार या बाबत सर्व मावळकराचे लक्ष लागले आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations