पिंपरी-चिंचवड मधील डॉक्टरांचा बारणे यांना जाहीर पाठिंबा.

देशाच्या आरोग्यासाठी 'मोदी 3.0' आवश्यक तर मानव जातीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या समस्यांचे लवकरच निराकरण - खासदार बारणे

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

आकुर्डी, दि. २७ एप्रिल : महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना  पिंपरी- चिंचवड मधील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना आकुर्डी येथे एकमुखी पाठिंबा जाहीर केला. दिवसेंदिवस बारणे यांना उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे तर देशाच्या आरोग्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे, असे मत खासदार बारणे यांनी व्यक्त केले.

शहरातील विविध डॉक्टर संघटनांची संयुक्त बैठक आकुर्डी येथे झाली. त्यात बारणे बोलत होते. बैठकीस ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. दिलीप कामत, डॉ. गणेश भोईर, डॉ. प्रताप सोमवंशी, डॉ. माया भालेराव, डॉ. सुभाष जाधवर, डॉ. संजीव संभूस, डॉ. अमित नेमाणे, डॉ. सुनील शेट्टी, डॉ. श्रीकृष्ण जोशी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

खासदार बारणे म्हणाले की, मानव जातीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे प्रश्न व समस्या यांचे निराकरण लवकरच करण्यात येईल. वैद्यकीय व्यावसायिकांना जास्तीत जास्त मदत करण्याची आपली नेहमीच भूमिका असते. 

डॉक्टरांप्रमाणेच आमच्याकडेही दररोज अनेक लोक त्यांची दुखणी घेऊन येतात व आम्ही आमच्या परीने त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतो, असे बारणे यांनी सांगितले. भ्रष्टाचाराच्या विरोधात कडक भूमिका घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फार मोठा दबदबा आहे. देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. ते खूप प्रामाणिकपणे व दूरदृष्टीने काम करतात, असे बारणे म्हणाले. गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा बारणे यांनी यावेळी सादर केला. 

डॉ. दिलीप कामत म्हणाले की, खासदार बारणे हे शहरातील डॉक्टरांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आमच्यासाठी हा हक्काचा माणूस आहे. त्यांची हॅटट्रिक होण्यासाठी आम्ही सर्व वैद्यकीय व्यावसायिक त्यांना एकमुखी पाठिंबा देत आहोत. डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी प्रभावी उपाय योजना करण्यासाठी तसेच अन्य समस्या सोडविण्यासाठी खासदार बारणे यांनी पुढाकार घ्यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. 

बैठकीनंतर खासदार बारणे यांनी उपस्थित डॉक्टरांशी वैयक्तिक संवादही साधला. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.